टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण भारतीय संघासाठी मागचा आठवडा दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता. कारण न्यूझीलंडने प्रथम भारताला अवघ्या ४६ धावांत ऑल आऊट केले आणि त्यानंतर ३६ वर्षांनंतर भारतीय भुमीवर टीम इंडियाचा धुव्वा उडवला.
न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ०-१ अशी पिछाडीवर पडली आहे. यानंतर मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुणे येथे खेळला जाणार आहे. पुण्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पलटवार करावा लागणार आहे.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याच्या स्टेडियमवर आतापर्यंत केवळ दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.
म्हणजे नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचे असेल. येथे पहिल्या डावाची सरासरी ४३० धावा आणि दुसऱ्या डावाची सरासरी १९० धावा आहे. तिसऱ्या डावात सरासरी २३७ धावा आणि चौथ्या डावात सरासरी १०७ धावा केल्या जातात.
येथे सर्वात मोठी धावसंख्या ५ बाद ६०५ ही भारताच्या नावावर आहे, जी त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती केली. तर सर्वात कमी स्कोअर सर्वबाद १०५ ही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. पुणे येथील पीच फिरकीपटूंना मदत करणारी आहे. या टर्निंग ट्रॅकवर चौथ्या डावात धावा करणे अत्यंत अवघड असेल.
अशा स्थितीत पुणे कसोटी ५ दिवस चालेल, याची शक्यता कमी आहे. भारताचे फिरकीपटू तीन-ते चार दिवसांत सामना संपवू शकतात. कारण रचिन रविंद्र आणि टॉम लॅथम यांच्याशिवाय फिरकी गोलंदाजी चांगल्या रितीने खेळू शकतील, असे फलंदाज न्यूझीलंडच्या संघात कमीच आहेत.
पुणे येथील स्टेडियमवर भारताने एक सामना जिंकला आहे तर एक सामना गमावला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे हे स्टेडिय सुब्रत रॉय सहारा स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. या मैदानावर आतापर्यंत केवळ दोनच कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारताचा रेकॉर्ड संमिश्र आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३३३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा एका डावाने पराभव केला. त्यावेळीही विराट कोहली कर्णधार होता. विराट कोहलीच्या २५४ धावांच्या नाबाद खेळीने प्रोटीज संघाचा एक डाव आणि १३७ धावांनी पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
संबंधित बातम्या