भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण हा निर्णय चांगलाच अंगलट आला आणि संपूर्ण टीम इंडिया अवघ्या ४६ धावांवर गारद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही तिसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.
न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने ५ आणि विल्यम ओ'रूकी याने ४ विकेट घेत भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले.
न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे ५ खेळाडू शून्यावर बाद झाले. या परीक्षेचा पहिला दिवस पावसात वाहून गेला. यानंतरही कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णये घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला. रोहितला टीम साऊदीने बाद केले. यानंतर विल्यम ओ’रूकने विराट कोहलीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर हेन्रीने सर्फराज खानला बाद केले. सर्फराजला खातेही उघडता आले नाही.
१० धावांत तीन विकेट पडल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. पण हे दोघेही किवी गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकले नाहीत. दोघांमध्ये २१ धावांची भागीदारी झाली, यानंतर ३२ धावांच्या एकूण धावसंख्येवर ओरूकने जैस्वालला बाद केले. एका चौकाराच्या जोरावर त्याला केवळ १३ धावा करता आल्या.
जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल क्रीजवर आला. मात्र राहुलही शुन्यावर बाद झाला. तो सहा चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनही शून्यावर बाद झाले. यानंतर जसप्रीत बुमराह एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताने अवघ्या ४० धावांत ९ विकेट गमावल्या होत्या. टीम इंडियाची आज दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या होईल असे वाटत होते, मात्र मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी किवी गोलंदाजांचा काही काळ सामना केला, मात्र या दोघांना आणखी फक्त ६ धावांची भर घालता आली. अशाप्रकारे टीम इंडिया ४६ धावांवर गडगडली.
संबंधित बातम्या