टी-20 विश्वचषक २०२४ चा दुसरा उपांत्य सामना (२७ जून) भारत आणि इंग्लंड यांच्यात काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. दक्षिण आफ्रिकेने तो जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. मात्र भारत-इंग्लंड उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.
जर सामन्यादरम्यान पाऊस पडला तर अडचणी येऊ शकतात. मात्र आयसीसीने या सामन्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवला आहे. यासोबतच षटकांच्या कपातीबाबतचे नियमही स्पष्ट करण्यात आले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना गयाना येथे होणार आहे. या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामना लांबणीवर पडू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. सेमीफायनल आणि फायनल मॅचमध्ये फक्त एका दिवसाचं अंतर आहे. या कारणास्तव यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी बराच अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. पाऊस सतत पडत राहिल्यास आणि तो थांबला नाही तर १२.१० नंतर षटके कमी करण्यास सुरुवात होईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाऊस पडल्यास १०-१० षटकांचा सामनाही खेळवला जाऊ शकतो. यासाठी रात्री ०१.४४ वाजता कट ऑफची वेळ निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय अनेक प्रकारचे नियमही घालून दिले आहेत.
पावसामुळे भारत-इंग्लंड सामना रद्द झाला, तर त्याचा फायदा रोहित शर्माच्या संघाला होईल. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचेल आणि इथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
भारत सुपर-८ च्या गुणतालिकेत अव्वल आहे, अशा स्थितीत अव्वल असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये जाण्याची संधी मिळले.