टी-20 वर्ल्डकप २०२४ आता शेवटच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेचे सेमी फायनलचे संघ ठरले आहेत. भारतीय वेळेनुसार या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना २७ जून रोजी सकाळी ६ वाजता खेळवला जाईल. त्यानंतर त्याच रात्री ८ वाजता दुसरा उपांत्य सामना होईल.
टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. दरम्यान सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन इंग्लंडविरुद्ध कशी असू शकते. हे येथे आपण पाहणार आहोत.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली उपांत्य फेरीच्या सामन्यातही डावाची सुरुवात करू शकतात. मात्र, किंग कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला या स्पर्धेत आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी उपांत्य फेरीत कर्णधार रोहित पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकू शकतो. अशा स्थितीत यशस्वी जैस्वाल याला पुन्हा एकदा बाकावर बसावे लागू शकते.
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. यानंतर सूर्यकुमार यादव येईल. शिवम दुबे पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. अशा स्थितीत संजू सॅमसनलाही बाकावर बसावे लागणार आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या दिसणार आहे. हार्दिकने या विश्वचषकात चेंडू आणि बॅट या दोन्ही गोष्टींमध्ये दम दाखवला आहे.
फिरकी विभागात पुन्हा एकदा रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे त्रिकूट पाहायला मिळेल. याचे कारण म्हणजे जडेजा आणि अक्षर बॅटनेही संघासाठी योगदान देऊ शकतात. अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी करताना दिसणार आहेत. या दोघांना साथ देण्यासाठी हार्दिक पांड्याही संघात आहे.
उपांत्य फेरीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
संबंधित बातम्या