मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत इंग्लंड २१८ धावांत गारद, कुलदीप यादवचे ५ विकेट

IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत इंग्लंड २१८ धावांत गारद, कुलदीप यादवचे ५ विकेट

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 07, 2024 03:13 PM IST

IND vs ENG Scorecard Test 2024 : इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला आहे. भारताकडून कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या.

IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत इंग्लंड २१८ धावांत गारद, कुलदीप यादवचे ५ विकेट
IND vs ENG Test : धर्मशाला कसोटीत इंग्लंड २१८ धावांत गारद, कुलदीप यादवचे ५ विकेट (AFP)

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला आहे. भारताकडून कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या.  त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या. आर अश्विन त्याचा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.

इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली होती. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली.

पण कुलदीपने ही भागीदारी तोडली. त्याने डकेटला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. डकेट २७ धावा करून बाद झाला. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील १४वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी कुलदीपने ऑली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडून यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोप केवळ ११ धावा करू शकला.

पहिल्या सत्रात इंग्लंडने २५.३ षटकात १०० धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या. पण यानंतर दुसऱ्या सत्रात इंग्लंडने २९.३ षटकात फलंदाजी करताना ६ गडी गमावून केवळ ९४ धावा केल्या. 

एके काळी इंग्लंडची धावसंख्या ३८व्या षटकात दोन गडी बाद १३७ धावा होती. यानंतर क्रॉलीची विकेट पडली आणि इथून इंग्लंडचा संपूर्ण डाव गडगडला. १३७ धावांवर दोन गडी बाद अशी अवस्था असताना इंग्लंडचा संघ ५८ व्या षटकात २१८ धावांवर गारद झाला. 

क्रॉलीने १०८ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७९ धावा केल्या. जो रूट २६ धावा करून बाद झाला, जॉनी बेअरस्टो २९ धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही.  अशा प्रकारे इंग्लंडचा डाव २१८ धावांवर आटोपला.

WhatsApp channel