india vs england 2nd test pitch report : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. हा सामना उद्या (शुक्रवारी) २ फेब्रुवारीपासून सुरू होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत दुसऱ्या सामन्यात भारताला विजय आवश्यक आहे.
मालिकेतील पहिल्या म्हणजेच हैदराबाद कसोटीत भारत आणि इंग्लिश संघाच्या फिरकीपटूंची जादू पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे भारतीय फलंदाज इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसत होते, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा दुसऱ्या सामन्याच्या खेळपट्टीवर खिळल्या आहेत.
मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणमच्या मैदानावर रंगणार आहे. विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांना मदत करते. येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तिन्ही फॉरमॅटच्या सर्वच सामन्यांमध्ये फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. अशा परिस्थितीत या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यातही अशीच खेळपट्टी पाहायला मिळेल.
पण, खेळ जसजसा पुढे जाईल, तसे फिरकी गोलंदाजांना पीच मदत करेल. म्हणजेच चौथ्या डावात फलंदाजी करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता येईल.
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले आहेत. आणि दोन्ही जिंकले आहेत. एका सामन्यात भारताने इंग्लंडचा २४६ धावांनी पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०३ धावांनी पराभव केला होता.
इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केला असून त्यात दोन बदल केले आहेत. मार्क वुडच्या जागी जेम्स अँडरसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.सोबतच दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज जॅक लीचच्या जागी शोएब बशीरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आहे. त्याचा हा पदार्पणाचा सामना असणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन - जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल/रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सरफराज खान/रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
संबंधित बातम्या