IND VS ENG 2nd TEST : भारताने पहिल्याच दिवशी ठोकल्या ३३६ धावा, यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या जवळ-india vs england 2nd test day 1 highlights scorecard vizag ind vs eng 2nd test yashasvi jaiswal century highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND VS ENG 2nd TEST : भारताने पहिल्याच दिवशी ठोकल्या ३३६ धावा, यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या जवळ

IND VS ENG 2nd TEST : भारताने पहिल्याच दिवशी ठोकल्या ३३६ धावा, यशस्वी जैस्वाल द्विशतकाच्या जवळ

Feb 02, 2024 04:55 PM IST

IND VS ENG 2nd TEST VIZAG : इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी यशस्वी जैस्वालने जबरदस्त फलंदाजी केली. पहिल्या दिवशी यशस्वी १७९ धावा करून नाबाद परतला.

India vs England 2nd Test
India vs England 2nd Test (REUTERS)

India vs England 2nd Test Day 1, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल १७९ धावा करून तर रविचंद्रन अश्विन ५ धावांवर नाबाद परतले आहेत, उद्या (३ फेब्रुवारी) दोघेही या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करतील.

या सामन्याचा पहिला दिवस संपूर्णपणे यशस्वी जैस्वालच्या नावावर राहिला. एकीकडे सातत्यने विकेट जात असताना दुसऱ्या टोकाला यशस्वी क्रीजवर राहिला आणि त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धाडसाने सामना केला. 

यशस्वीने आज २५७ चेंडूंचा सामना करताना १७९ धावा केल्या. यात त्याने १७ चौकार आणि ५ ठोकले. यशस्वीचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. त्याचे पहिले शतक (१७१ धावा) गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध झाले होते.

भारताची दमदार सुरुवात

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. कर्णधार रोहित मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण तो नवोदित फिरकी गोलंदाज शोएब बशीरच्या जाळ्यात अडकला. रोहित १४ धावा करून बाद झाला.

त्यानंतर पहिल्या सत्रात शुभमन गिलदेखील जेम्स अँडरसनचा बळी ठरला. गिल देखील चांगल्या टचमध्ये दिसत होता, पण तो तो मोठी खेळी करून शकला नाही.

यशस्वीने १५१ चेंडूत शतक पूर्ण केले

शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांनी ९० धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान यशस्वीने १५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टॉम हार्टलीच्या चेंडूवर षटकार खेचून यशस्वीने आपले शतक पूर्ण केले. यशस्वीच्या कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे शतक ठरले.

यानंतर श्रेयस अय्यरदेखील गिलप्रमाणेच सेट झाल्यानंतर बाद झाला. पण त्यानंतर यशस्वीने नवोदित खेळाडू रजत पाटीदारसोबत चौथ्या विकेटसाठी ७०  धावांची भागीदारी केली. 

पाटीदार (३२) बाद झाल्यानंतर जैस्वालने अक्षर पटेलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. पदार्पणाच्या डावात रजत पाटीदारने ३२ तर  अक्षर पटेलने २७ धावा केल्या. यानंतर भारताने पहिल्या दिवसाच्या खेळात केएस भरतची विकेटही गमावली. इंग्लंडकडून आज शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner