टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये टीम इंडिया आज शनिवारी (१५ जून) शेवटचा गट सामना खेळणार आहे. फ्लोरिडाच्या लॉडरहिल येथील स्टेडियमवर टीम इंडिया कॅनडाला भिडणार आहे.
मात्र, फ्लोरिडामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाने कहर केला आहे. त्यामुळे शुक्रवारचा आयर्लंड आणि अमेरिका यांच्यातील सामना रद्द करण्यात आला होता. भारत आणि कॅनडा यांच्यातील सामन्यावरही पावसाचे सावट आहे.
दरम्यान, भारत सलग चौथा विजय नोंदवण्याचा आणि कॅनडाविरुद्ध पहिला T20 सामना खेळण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा संघाच्या प्लेइंग इलेव्हन कॉम्बिनेशनमध्ये बदल करू शकतो. जेणेकरून सुपर ८ च्या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देता येईल.
तर दुसरीकडे, कॅनडाला फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क मैदानावर विजय मिळवून त्यांच्या मोहिमेचा शेवट करायचा आहे.
लॉडरहिलमध्ये या आठवडाभर पाऊस आणि वादळ सुरू होते. त्यामुळे या विश्वचषकातील या मैदानावरील पहिला सामना शुक्रवारी रद्द करण्यात आला. या मैदानावर शुक्रवारी यूएसए आणि आयर्लंड यांच्यात सामना होणार होता. सामना रद्द झाल्याचा फायदा अमेरिकेला झाला आणि ५ गुणांसह सुपर-८ साठी पात्र ठरले.
Accuweather च्या मते, सामन्यादरम्यान पावसाची ३५% ते ४५% आणि वादळाची ५०% शक्यता आहे. दुपारभर तापमान २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रता ८०% राहू शकते. सकाळी पावसाची ३०% शक्यता आहे, जी संपूर्ण सामन्यात कायम राहण्याची शक्यता आहे.
कॅनडाविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.