भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) हा सामना सुरू आहे, ज्यामध्ये चाहत्यांना विराट कोहलीच्या बॅटकडून शतकाची अपेक्षा आहे.
अशा परिस्थितीत विराट कोहलीचा एक छोटा चाहता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, जो कोहलीला पाहण्यासाठी ५८ किलोमीटर सायकल चालवून ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर पोहोचला आहे.
भारतातील क्रिकेटची क्रेझ सर्वश्रुत आहे आणि विराट कोहलीला आपला आदर्श मानणाऱ्या १५ वर्षीय कार्तिकेय याने हाच जोश दाखवला आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी असलेल्या कार्तिकेयने विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमपर्यंत ५८ किलोमीटर सायकल चालवून आला.
कार्तिकेयने पहाटे ४ वाजता त्याच्या सायकलवरून प्रवास सुरू केला आणि वेळेवर स्टेडियमवर पोहोचला. तो कोहलीला भेटणार असल्याने त्याच्या पालकांनी त्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती. भारत-बांगलादेश कसोटीच्या पहिल्या सत्रात पावसाने व्यत्यय आणला, पण कार्तिकेय वेळेवर स्टेडियममध्ये पोहोचला.
बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहेत. भारतीय गोलंदाजांनी आज दिवसभरात ३५ षटके टाकली यात बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या. पावसामुळे आज ३५ षटकांचाच खेळ होऊ शकला. मोमीनूल ३१ तर मुशफिकूर रहीम ६ धावांवर नाबाद परतले.
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजे कुलदीप किंवा अक्षर या दोघांनाही संधी मिळाली नाही. जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांसह भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर अश्विन आणि जडेजा फिरकीपटूंची जबाबदारी सांभाळतील.
तर बांगलादेशचा कर्णधार नजमुलने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि नाहिद राणा यांच्या जागी तैजुल इस्लाम आणि खालिद अहमद यांना प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळाले.
बांगलादेश : शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
भारत: यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.