India Vs Australia Todays Match : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (४ मार्च) दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने १४व्यांदा नाणेफेक गमावली आहे.
ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. तर टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियन प्लेइंग इलेव्हनमध्ये मॅथ्यू शॉर्ट याच्या जागी कूपर कॉनोली आणि स्पेन्सर जॉन्सन याच्या जागी लेगस्पिनर तनवीर संघा आला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिश, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा.
ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ वेळा पराभव केला आहे. दोन्ही संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ च्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आले होते. ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा ४४ धावांनी पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफी २००० मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला होता. यानंतर २०११ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला होता.
तसेच, ICC ODI स्पर्धांच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ३ वेळा पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषक २००३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पराभव केला. यानंतर एकदिवसीय विश्वचषक २०१५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. याशिवाय २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा वरचष्मा राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला दोनदा पराभूत केले आहे. त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघ भारताला पराभूत करू शकलेला नाही.
पण एकदिवसीय स्वरूपातील एकूण रेकॉर्ड याच्या उलट आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १५१ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ८४, तर भारताने ५७ सामने जिंकले आहेत.
संबंधित बातम्या