India vs Australia, 1st Semi-Final : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा पहिला उपांत्य सामना आज (४ मार्च) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २६४ धावांवर गारद केले, ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ७३ धावांची चांगली खेळी केली. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ३ बळी घेतले, ज्यात स्मिथच्या महत्त्वपूर्ण विकेटचा समावेश होता.
नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीला आला आणि डावाची सुरुवात ट्रॅव्हिस हेड आणि कूपर कोनोली यांनी केली. कॉनोलीला बॅटने चेंडूही खेळता आला नाही, अखेरीस तो मोहम्मद शमीच्या हाती विकेटच्या मागे झेलबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने डावाची धुरा सांभाळली. क्रीजवर स्थिरावल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने स्फोटक फलंदाजीला सुरुवात केली, मात्र वरुण चक्रवर्तीने त्याचा डाव मोठा होऊ दिला नाही. ट्रॅव्हिस हेडने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या.
सुरुवातीच्या विकेट्सनंतर, कर्णधार स्टीव्ह स्मिथने जबाबदारी स्वीकारली, त्याने ७३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ९६ चेंडूत खेळलेल्या या खेळीत स्टीव्ह स्मिथने १ षटकार आणि ४ चौकार लगावले. स्मिथला ३७ व्या षटकात मोहम्मद शमीने बोल्ड केले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १९८/५ होती. यानंतर स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ७ धावांवर बाद झाला, अक्षर पटेलने त्याला आपला शिकार बनवले.
यानंतर ॲलेक्स कॅरीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. डेथ ओव्हर्समध्ये कॅरीने चांगली फलंदाजी केली. त्याने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला.
संबंधित बातम्या