बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ ची पहिली कसोटी भारताने २९५ धावांनी जिंकून दौऱ्याची शानदार सुरुवात केली. आता मालिकेतील दुसरा सामना उद्यापासून म्हणजेच ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने होणाऱ्या या दिवस-रात्र कसोटीसाठी भारतीय संघ कठोर मेहनत घेत आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा वडील झाल्यानंतर संघात सामील झाला आहे. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चितच आहे.
पर्थ कसोटीतील दुसऱ्या डावात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी २०५ धावांची सलामी भागीदारी करण्याचा विक्रम केला. जैस्वालने शतक तर राहुलने ७७ धावा केल्या.
यानंतर रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचे, त्यानेच सांगितले आहे. अशा स्थितीत राहुल आणि जैस्वाल सलामीला खेळतील. तसेच, रोहित शर्माची यावर्षीची कसोटीतील माफक कामगिरी लक्षात घेता तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर येऊ शकतो.
दुसऱ्या कसोटीत देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्या जागी रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा समावेश होण्याची शक्यता आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर, विराट चौथ्या क्रमांकावर आणि ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो.
तर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांनी पर्थमध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले. पुढच्या सामन्यातही दोघांचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
पहिल्या सामन्यात भारताने अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला खेळवले होते. अश्विनच्या नावावर ५३० पेक्षा जास्त विकेट आहेत, रवींद्र जडेजाच्या नावावर ३०० पेक्षा जास्त कसोटी विकेट आहेत. असे असूनही, मॅनेजमेंटने सुंदरवर विश्वास दाखवला होता.
अश्विनने पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात भाग घेतला नाही, यावरून अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविण्याच्या शर्यतीत नाही. गुलाबी चेंडूच्या कसोटीत भारताचा जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांच्या रूपाने केवळ ४ वेगवान गोलंदाज मैदानात उतरतील, अशा स्थितीत दोन्ही दिग्गजांना पुन्हा बाहेर बसावे लागू शकते.
पिंक बॉल टेस्टसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
संबंधित बातम्या