IND vs AUS Day Night Test Match Time : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पर्थमधील ऑप्टस क्रिकेट स्टेडियमवरून सुरू झाली. यजमान ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीसाठी वरचढ दिसत होता. पण भारतीय संघाने दमदार कामगिरी करत कांगारूंना २९५ धावांनी धुळ चारली.
विशेष म्हणजे, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट तज्ज्ञ आणि काही चाहत्यांनी असा दावाही केला होता की टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ५-० ने गमावेल. पण पर्थमध्ये जे घडले ते चमत्कारापेक्षा कमी नव्हते. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत कांगारूंचा २९५ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला आणि विशेष म्हणजे, ऑप्टस स्टेडियमवर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाच्या या विजयाची इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद केली जाईल.
भारत-ऑस्ट्रेलिया ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर आता मालिकेतील दुसऱ्य कसोटी सामन्याची उत्सुकता लागली आहे. अशा स्थितीत BGT मधील दुसरी कसोटी कधी आणि कुठे खेळली जाईल हे जाणून घेऊया.
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना कुठे आणि कधी होणार?
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळवली जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळली जाईल. ॲडलेड कसोटीला भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल.
पिंक बॉल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड अप्रतिम आहे. कांगारू संघाने आतापर्यंत १२ पिंक बॉल टेस्ट सामने खेळले आहेत, त्यापैकी ११ जिंकले आहेत. त्यांना वेस्ट इंडिजकडून केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दुसरीकडे, भारताने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ पिंक बॉल टेस्टमध्ये ३ कसोटी सामने जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला आहे.
रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीत खेळणार
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत उपलब्ध नव्हता. पण पर्थ कसोटीदरम्यान रोहित ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. पर्थमध्ये ॲडलेड कसोटीसाठीही त्याने गुलाबी चेंडूने सराव केला होता. दुसऱ्या कसोटीत हिटमॅन खेळताना दिसण्याची शक्यता आहे.