India vs Afghanistan 3rd T20I Playing 11 : टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१७ जानेवारी) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता जर भारतीय संघाने तिसरा सामनाही जिंकला तर अफगाणिस्तानला क्लीन स्वीपसह पराभूत करेल. विशेष म्हणजे, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही पहिला द्विपक्षीय मालिका आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-20 सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये टी-20 विश्वचषकही खेळायचा आहे. त्याआधी भारताची ही शेवटची टी-20 मालिका आहे. या दृष्टीनेही हा शेवटचा सामना असेल.
अशा परिस्थितीत तिसऱ्या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हन खूप खास असणार आहे. वर्ल्डकपआधी शेवटचा टी-20 सामना कोण खेळणार आणि कोणाला बाहेर बसवलं जाईल याकडे चाहत्यांची नजर राहणार आहे.
यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. त्याच्या जागी जितेश शर्माला संधी मिळाली. मात्र आता तिसऱ्या सामन्यातही संजूला संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.
तसेच, या तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघात एक बदल करू शकतो. फिरकीपटू रवी बिश्नोईला विश्रांती देऊन वेगवान गोलंदाज आवेश खान किंवा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.
अफगाणिस्तान क्रिकेट संघातही एक बदल होऊ शकतो. लेगस्पिनर कैस अहमदला डावखुरा मनगटी स्पिनर नूर अहमदच्या जागी संधी मिळू शकते. यापूर्वी अहमदने यूएईविरुद्धच्या मालिकेत आपल्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. अशा स्थितीत भारताविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला स्थान मिळू शकते.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई/आवेश खान/कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनत, फजलहक फारुकी, नूर अहमद/कैस अहमद, नवीन उल हक आणि मुजीब उर रहमान.