भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामनाआज रविवारी (१४ जानेवारी) संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला, त्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला कडवी टक्कर दिली होती. मात्र संघाला विजयाची नोंद करता आली नाही.
टीम इंडियाच्या त्या सामन्यातील विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दुबेने ६० धावांची नाबाद खेळी केली तसेच, एक विकेटही घेतला होता. आता दुसरा सामना जिंकून या मालिकेत विजयी आघाडी घेण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.
इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. या मैदानावर नेहमीच हाय स्कोअरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. अशा स्थितीत धावांचा वेग रोखणे गोलंदाजांसाठी सोपे काम नाही.
मात्र, फिरकीपटूंना खेळपट्टीवरून थोडीफार मदत मिळू शकते. खेळपट्टीवर चांगल्या बाऊन्समुळे, चेंडू अगदी सहजपणे बॅटवर येतो, यामुळे फलंदाजांना शॉट्स खेळणे सोपे जाते.
त्याच वेळी, येथील आउटफिल्ड देखील खूप वेगवान आहे. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या तरी या धावांचा बचाव करणे गोलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.
नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो जेणेकरून नंतर दव आल्यावर लक्ष्याचा पाठलाग अधिक सहज करता येईल.
मात्र, आतापर्यंत येथे झालेल्या तीन टी-२० सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा विजय मिळवला आहे, तर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ एकदाच विजय मिळवला आहे.
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान- हमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.
संबंधित बातम्या