IND vs AFG 1st T20 Weather Report : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला आज गुरुवारपासून (११ जानेवारी) सुरुवात होणार आहे. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. हा सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजल्यापासून खेळवला जाईल.
१४ महिन्यांनंतर टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर सर्वांच्या नजरा असतील. मात्र वैयक्तिक कारणांमुळे कोहली मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला T20 सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. मोहालीमध्ये सूर्यास्तानंतरच तापमानात घट दिसून येते. यासोबतच प्रचंड दव पडते, त्यामुळे खेळावरही परिणाम होऊ शकतो. सोबतच मोहालीत धुके हीदेखील एक मोठी समस्या असू शकते.
खरे तर, जानेवारी महिन्यात उत्तर भारतात थंडीच्या काळात भरपूर धुके असते. अशा परिस्थितीत, सामना दरम्यान धुके असल्यास, कमी दृश्यमानतेमुळे तो थांबविला जाऊ शकतो आणि रद्द देखील होऊ शकतो.
सामन्याच्या दिवशी किमान तापमान ५ ते ६ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. याशिवाय वारेही वाहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत खेळाडूंना थंडीचाही सामना करावा लागू शकतो.
टीम इंडियाने मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर आत्तापर्यंत एकूण ४ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील तीन सामने भारताने जिंकले आहेत. मात्र, येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तान : इब्राहिम झादरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरन, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्ला उमरझाई, शरफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद , नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब.