मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  U19 WC 2024 : सुपर-६ सामन्यात मुशीर खानच्या वादळी १३१ धावा, भारताचे न्यूझीलंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य

U19 WC 2024 : सुपर-६ सामन्यात मुशीर खानच्या वादळी १३१ धावा, भारताचे न्यूझीलंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 30, 2024 05:29 PM IST

U19 World Cup 2024 : सुपर-६ सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर २९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून मुशीर खानने १३१ धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने ५२ धावा केल्या.

U19 World Cup 2024 ind vs nz
U19 World Cup 2024 ind vs nz

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सुपर सिक्सचा थरार सुरू झाला आहे. सुपर-६ सामन्यात आज (३० जानेवारी) भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताने ५० षटकात ८ २९५ धावांचा डोंगर उभारला आहे. आता न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी २९६ धावा करायच्या आहेत.

भारताकडून मुशीर खानने सर्वाधिक १३१ धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने ५२ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

त्याआधी टॉस गमावून प्रथम फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी ९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्श सिंगने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. आदर्श ५८ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत ८७ धावांची भागीदारी केली.

पण मोठा फटका मारण्याच्या नादात उदयने आपली विकेट गमावली. तो ३४ धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने भारताच्या विकेट पडत राहिल्या. 

या दरम्यान, मुशीर खानने शानदार शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने ४ सामन्यांच्या ४ डावात ८१.२५ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध ३, आयर्लंडविरुद्ध ११८ धावा आणि अमेरिकेविरुद्ध ७३ धावा केल्या होत्या. या सामन्यात तो १२६ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावा करून बाद झाला.

शेवटी अरावेली अवनीश १७ धावा करून बाद झाला, तर प्रियांशू मोलिया १० धावा करून बाद झाला. सचिन धसने १५ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने ४ विकेट घेतल्या. तर रेयार सोर्गस, इवाल्ड श्रुडर, जॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi