India Vs England Test Series Schedule : भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका म्हणजे लवकरच सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथा टप्प्याचा भाग असेल.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ईसीबी) इंग्लंड पुरुष आणि महिला २०२५ उन्हाळी आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यात भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या वेळापत्रकाचा देखील समावेश आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ (Team India) पुढील वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर असून दोन संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे.
भारतीय महिला संघाची पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २८ जून ते १२ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ १६ जुलै ते २२ जुलै दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
भारतीय पुरुष संघाची पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जून ते ४ ऑगस्ट दरम्यान खेळली जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना २० ते २४ जून दरम्यान लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तर, दुसरा कसोटी सामना २ ते ६ जुलै दरम्यान बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जाईल.
तिसरा कसोटी सामना १० ते १४ जुलै दरम्यान लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात येणार आहे. चौथा कसोटी सामना २३ ते २७ जुलै दरम्यान मँचेस्टरच्या एमिरेट्स ओल ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना ३१ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान लंडनच्या किआ ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.