IND Vs NZ ICC WC 2023 Semi Final : क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मधील पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ४ बाद ३९७ धावांचा डोंगर उभारला.
तत्पूर्वी, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा रोहित शर्माचा निर्णय अगदी योग्य ठरला. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली.
कर्णधार रोहित शर्मा (४७), शुभमन गिल (८०) यांनी पहिल्या ८.२ षटकात ७१ धावा जोडल्या. शानदार सुरुवात दिल्यानंतर रोहित शर्मा ९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर टीम साऊथीचा बळी ठरला. भारतीय कर्णधाराने २९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या.
त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी ८६ चेंडूत ९३* धावांची नाबाद भागीदारी केली. ही भागीदारी केवळ ९३ धावांवर नाबाद राहिली कारण २३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गिल क्रॅम्पमुळे निवृत्त झाला. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२८ चेंडूत १६३ धावांची भागीदारी केली.
कोहलीने ११३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. यानंतर, डावाच्या शेवटच्या टप्प्यात श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी २९ चेंडूत ५४ धावांची भागीदारी केली. अय्यरने ७० चेंडूत १०५ धावा केल्या. अय्यरच्या खेळीत ४ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता.
यानंतर सूर्यकुमार यादव ५० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर १ धावा काढून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल आणि सलामीला आलेला शुभमन गिल नाबाद परतले. गिलने ६६ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर केए राहुलने २० ३९ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
विराट कोहलीने (११७) वनडे क्रिकेटचे ५० शतके झळकावले. अशा प्रकारे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू बनला.
श्रेयस अय्यरनेही (१०५) झंझावाती शतक झळकावले. न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज टीम साऊथी होता, त्याला दोन विकेट मिळाले. तर ट्रेंट बोल्टला एक विकेट मिळाली.
यासह भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने २६ मार्च २०१५ रोजी सिडनी येथे भारताविरुद्धच्या उपांत्य फेरी सामन्यात ५० षटकात ७ बाद ३२८ धावा केल्या होत्या.