भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३५७ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय संघ ५० षटकात ३५६ धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून शुभमन गिलने शतक झळकावले.
भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावा केल्या. याशिवाय विराट कोहलीने ५२, श्रेयस अय्यरने ७८ आणि केएल राहुलने ४० धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकातच बाद झाला. रोहित वेगवान गोलंदाज मार्क वुडकडे यष्टिरक्षक फिल सॉल्टच्या हाती झेलबाद झाला. रोहितने दोन चेंडूत केवळ १ धाव केली.
यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी झाली. शुभमन गिलने ५१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने ५० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. कोहलीचे वनडे कारकिर्दीतील हे ७३ वे अर्धशतक होते.
मात्र, विराट कोहली अर्धशतक झळकावून काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली फिरकीपटू आदिल रशीदच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक फिल सॉल्टच्या हाती झेलबाद झाला. कोहलीने ५५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने शुभमन गिलसह झटपट फलंदाजी केली. शुभमनने ९५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
शुभमन गिलचे हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७ वे शतक होते. याशिवाय त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत. तर गिलने आंतरराष्ट्रीय T20 मध्येही शतक झळकावले आहे. अशाप्रकारे या स्टार सलामीवीराने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.
शुभमनने शतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस आणि शुभमनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी झाली.
शुभमन १०२ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ षटकार मारले. शुभमनला आदिल रशीदने बोल्ड केले. यानंतर राशिदने श्रेयस अय्यरलाही बाद केले. श्रेयसने ६४ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावा केल्या.
हार्दिक पंड्या (१७) आणि अक्षर पटेल (१३) फलंदाजीत विशेष काही करू शकले नाहीत. केएल राहुलने राहुलने २९ चेंडूत ४० धावा केल्या, ज्यात ३ चौकार आणि १ षटकार होता.
हर्षित राणा (१३), वॉशिंग्टन सुंदर (१४) आणि अर्शदीप सिंग (२) हेही स्वस्ता बाद झाले. इंग्लंडकडून आदिल रशीदने ६४ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. तर मार्क वुडने दोन विकेट मिळविले. गुस ऍटकिन्सन, साकिब महमूद आणि जो रूट यांनाही प्रत्येकी १ विकेट मिळाली.
संबंधित बातम्या