हैदराबादमध्ये आक्रमक फलंदाजी करताना संजू सॅमसनने शतक झळकावले आहे. बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाकडून फलंदाजी करताना त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. सॅमसनसोबतच सूर्यकुमार यादवनेही स्फोटक फलंदाजी केली.
भारताने निर्धारित २० षटकार ६ बाद २९७ धावांचा पाऊस पाडला आहे. बांगलादेशला २० षटकात विजयासाठी २९८ धावा कराव्या लागणार आहेत.
तत्पूर्वी, संजूने एकाच षटकात सलग ५ षटकार मारले. ही घटना भारतीय डावाच्या १०व्या षटकात घडली, जेव्हा बांगलादेशकडून रिशाद हुसैन गोलंदाजी करायला आला. याआधी हुसेनने पहिल्या षटकात १६ धावा दिल्या होत्या. यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकात सॅमसनने त्याला चांगलेच फटकावले.
ओव्हरचा पहिला चेंडू डॉट गेला, पण पुढचा चेंडू सॅमसनने स्ट्रेटच्या दिशेने सीमापार पाठवला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवरही सॅमसनने लाँगऑफच्या दिशेने षटकार मारला.
सॅमसनचा आयपीएल फॉर्म यावेळी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाला. त्याची बॅट थांबायला तयार नव्हती आणि शानदार स्टाईलमध्ये त्याने षटकारांची हॅट्ट्रिक पूर्ण केली, तर दुसरीकडे रिशाद हुसेनचा चेहरा उदास दिसत होता.
त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार आल्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही आनंदाने हसताना दिसले. रिशाद हुसैनच्या या ओव्हरपूर्वी संजू सॅमसनने २९ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या. तर डावाचे १० वे षटक पूर्ण झाल्यानंतर त्याची धावसंख्या ३५ चेंडूत ९२ धावा झाली होती.
या सामन्यात सॅमसनचा डाव ४७ चेंडूत १११ धावांवर संपला, ज्यात त्याने २३६ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. यासह त्याने ११ चौकार आणि ८ षटकारही मारले. त्याची सूर्यकुमार यादवसोबतची १७३ धावांची भागीदारीही ऐतिहासिक ठरली.
टीम इंडियाने बांगलादेशला विजयासाठी २९८ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताने २० षटकात ६ गडी गमावून २९७ धावा केल्या. संजू सॅमसनने स्फोटक फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने ४७ चेंडूंचा सामना करत १११ धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले आहेत.
तर सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले. हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. रियान परागने ३४ धावांची खेळी केली.