भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर २८४ धावांचे लक्ष्य ठेवले.
सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा स्वीकारला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (३६) यांनी सलामीला धावांची भागीदारी केली. यानंतर संजूने तिलक वर्मासोबत विक्रमी ९३ चेंडूत २१० धावांची नाबाद भागीदारी केली. संजू सॅमसनने ५१ चेंडूत शतक तर तिलक वर्माने ४१ चेंडूत शतक झळकावले.
संजू सॅमसनने ५६ चेंडूत १०९ धावांची शानदार खेळी केली. तर तिलकने ४७ चेंडूत १२० धावा केल्या. संजूचे हे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक होते, जे त्याने गेल्या ५ सामन्यांमध्ये झळकावले आहे. दुसरीकडे, तिलक वर्मा याचे हे दुसरे शतक आहे.
या मालिकेतही त्याने सलग दोन्ही शतके झळकावली आहेत. तर आफ्रिकन संघाकडून लुथो सिपमला याने एकमेव विकेट घेतली.
टी-20 इतिहासात प्रथमच, ICC पूर्ण राष्ट्र सदस्य संघांमध्ये एका संघातील दोन फलंदाजांनी एकत्र शतके झळकावली आहेत. हा इतिहास आहे. एकूणच या फॉरमॅटमध्ये हे तिसऱ्यांदा घडलं आहे.
दुसरा विक्रम : या सामन्यात भारतीय संघाने १ गडी बाद २८३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २ ऑक्टोबर २०२२ रोजी ३ विकेट्सवर २३७ धावा केल्या होत्या.