चेन्नई कसोटीत धमाकेदार विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताच्या विजयानंतर लगेचच बीसीसीआयने दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी निवड समितीने तोच संघ कायम ठेवला आहे. बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठी संघात कोणताही बदल केलेला नाही. दुसऱ्या कसोटीसाठीही तोच १६ सदस्यांचा संघ आहे.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
दुलीप करंडक स्पर्धेत शानदार शतक झळकावणारा ईशान किशन आणि सलग अर्धशतके झळकावणारा ऋतुराज गायकवाड या खेळाडूंकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे. यानंतर श्रेयस अय्यरची दुसऱ्या कसोटीसाठी निवड झालेली नाही.
तत्पूर्वी, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाने २८० धावांनी जिंकली. या सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. लंचपूर्वी बांगलादेशचा संघ २३४ धावांवर गडगडला.
आर अश्विन भारताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या आणि या सामन्याच्या पहिल्या दमदार फलंदाजी करत शतकही झळकावले.
अश्विनचे शतक (११३) आणि रवींद्र जडेजाच्या (८६) धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या १४९ धावांत सर्वबाद झाला.
भारताकडून पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात भारताने ४ बाद २८७ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करण्यात बांगलादेशचा संघ अपयशी ठरला आणि चौथ्या दिवशी २३४ धावांवर सर्वबाद झाला.