भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. मात्र, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे सोपे असणार नाही.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रोहित शर्मा कोणत्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेसाठी होणार आहे. मात्र, बीसीसीआयने पहिल्या कसोटीसाठीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. बोर्डाने पहिल्या कसोटीसाठी १६ खेळाडूंचा संघ निवडला आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंचा सहभाग आहे.
पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे तर कर्णधार रोहित शर्मा आणि स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करू शकतात. यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे.
यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. दक्षिण आफ्रिकेत पाचव्या क्रमांकावर खेळताना राहुलने शानदार शतक झळकावले होते. अशा स्थितीत सरफराज खानऐवजी त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची अधिक शक्यता आहे. राहुलला संधी मिळाल्यास सरफराजला बेंचवर बसावे लागेल.
यष्टीरक्षक ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर कर्णधार आणि प्रशिक्षकाची पहिली पसंती असू शकतो. अशा स्थितीत ध्रुव जुरेल याला बाकावर बसावे लागणार आहे. यानंतर तीन फिरकीपटूंना संधी मिळेल. यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यासह चायनामन कुलदीप यादव असू शकतो.
याचा अर्थ अक्षर पटेल याला संधी मिळणे, कठीण आहे. त्याला बाकावर बसावे लागू शकते. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज ही जोडी ॲक्शन करताना पाहायला मिळेल.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.