जडेजा-वॉशिंग्टन बाहेर, अश्विन खेळणार; नितीश रेड्डीचं पदार्पण, पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  जडेजा-वॉशिंग्टन बाहेर, अश्विन खेळणार; नितीश रेड्डीचं पदार्पण, पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

जडेजा-वॉशिंग्टन बाहेर, अश्विन खेळणार; नितीश रेड्डीचं पदार्पण, पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Nov 20, 2024 11:19 AM IST

India Playing 11 vs Australia in Perth Test : २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यात रविंद्र जडेजा आणि वाशिंग्टन सुंदर यांना बाहेर बसावे लागू शकते. तर आर अश्विन प्लेइंग इलेव्हनचा भाग होऊ शकतो.

जडेजा-वॉशिंग्टन बाहेर, अश्विन खेळणार; नितीश रेड्डीचं पदार्पण, पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
जडेजा-वॉशिंग्टन बाहेर, अश्विन खेळणार; नितीश रेड्डीचं पदार्पण, पर्थ कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (AP)

भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे टीम इंडियाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. मात्र हा सामना भारतीय संघासाठी सोपा असणार नाही.

वास्तविक, भारतीय संघ या पर्थ कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्याविना खेळणार आहे. अशा स्थितीत, पर्थ कसोटीत भारताची निम्मी प्लेइंग-११ पूर्णपणे नवीन असणार आहे.

रोहित-गिल-शमी पर्थ कसोटी खेळणार नाहीत

रोहित शर्मा नुकताच पिता झाला आहे. अशा परिस्थितीत तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. दुसरीकडे, शुभमन गिल सरावादरम्यान जखमी झाला. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याला २ आठवडे विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, शमी दुखापतीतून सावरला असला तरी तो दुसऱ्या कसोटीपासून संघात सामील होऊ शकतो.

अशा स्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्थ कसोटीत रोहितच्या जागी कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. रोहितच्या जागी केएल राहुल सलामीला येऊ शकतो. यशस्वी जैस्वाल ही त्याचा दुसरा जोडीदार असेल.

ध्रुव जुरेल खेळणार

शुबमन गिलच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलचा समावेश केला जाऊ शकतो, जो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. दुसरीकडे, विराट कोहली, सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांच्यावरही मधल्या फळीत मोठी जबाबदारी असणार आहे.

फिरकीत अश्विन खेळणार, जडेजा-सुंदर बाहेर

पर्थ कसोटीत रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याऐवजी भारत एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून रविचंद्रन अश्विन याला खेळवू शकतो. ऑस्ट्रेलियन बॅटिंग युनिटमध्ये किमान तीन डावखुरे फलंदाज असल्याने थिंक टँकच्या भूमिकेत बदल झाल्याचे बोलले जात आहे.

मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया ग्रीन टॉप देण्याच्या तयारीत असल्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ सीम बॉलिंगचे चार पर्याय ठेवण्याची शक्यता आहे. तज्ञ फिरकीपटू म्हणून केवळ नॅथन लायन संघात असलेल्या ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतही केवळ एक फिरकी गोलंदाज खेळवू शकतो. गेल्या काही वर्षांत परदेशात फिरकी गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंची पहिली पसंती रवींद्र जडेजा आहे, कारण त्याने उसळत्या पीचवर उत्कृष्ट फलंदाजी केली आहे, परंतु पर्थमध्ये जडेजाऐवजी अश्विन खेळू शकतो.

अशा स्थितीत ऑलराऊंडर नितीश रेड्डीचे पदार्पण निश्चित मानले जात आहे. बुमराह, सिराज हे वेगवान गोलंदाज निश्चित खेळणार आहे. तसेच, हर्षित राणा किंवा आकाशदीप यांच्यापैकी एक जण खेळेल. तर चौथा वेगवान गोलंदाज नितीश रेड्डी असेल.

पर्थ कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह (कर्णधार), हर्षित राणा/आकाशदीप आणि मोहम्मद सिराज.

Whats_app_banner