India vs England ODI Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. पण लवकरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ टीम इंडियाची घोषणा करू शकते.
अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन होऊ शकते. त्यांच्यासोबत अर्शदीप सिंग यालाही पुनरागमनाची संधी मिळू शकते. अय्यरने अलीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. अर्शदीपही चांगल्या लयीत दिसला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग टीम इंडियात परत येऊ शकतात. पांड्या बऱ्याच दिवसांपासून भारताच्या वनडे संघातून बाहेर आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.
तर हार्दिकने शेवटचा टी-20 सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळला होता. पांड्या सध्या देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळत आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळू शकते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अय्यर मुंबईकडून खेळतो. अय्यरने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याने पुद्दुचेरीविरुद्ध स्फोटक शतक झळकावले. अय्यरने १३७ धावांची नाबाद खेळी केली होती. त्याने कर्नाटकविरुद्धही शतक झळकावले. अय्यरने या सामन्यात नाबाद ११४ धावा केल्या होत्या.
अर्शदीप सिंग देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून खेळत आहे. त्याने अलीकडे घातक गोलंदाजी केली आहे. अर्शदीपने पुद्दुचेरी आणि हैदराबादविरुद्ध ४-४ विकेट घेतल्या. मुंबईविरुद्ध ५ बळी घेतले. कर्नाटक आणि सौराष्ट्रविरुद्धही त्याने घातक गोलंदाजी केली.
संबंधित बातम्या