मेलबर्न कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ९ गडी गमावून २२८ धावा केल्या होत्या. कांगारू संघाने पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेतल्याने चौथ्या दिवसअखेर त्यांची एकूण आघाडी ३३३ धावांची झाली होती.
यानंतर आज पाचव्या दिवशी, ऑस्ट्रेलियाला आपल्या डावात आणखी फक्त ६ धावा जोडता आल्या, त्यामुळे त्यांचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला. आता टीम इंडियाला मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी एकूण ३४० धावा कराव्या लागणार आहेत.
हे वृत्त लिहिपर्यंत टीम इंडियाने १५ षटकात बिनबाद २५ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सावध फलंदाजी करत आहेत.
मेलबर्न कसोटीत, खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला, तर खराब हवामानामुळे अनेक षटकेही खेळता आली नाहीत. तिसऱ्या दिवशी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पाचव्या दिवशी षटकांची संख्या ९८ करण्यात आली आहे.
पण आता टीम इंडियाकडे ३४० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी ९२ षटके म्हणजेच ५५२ चेंडू शिल्लक आहेत. बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे अव्वल फलंदाज गारद झाले होते. पण नितीशकुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील १२८ धावांच्या भागीदारीमुळे भारताला फॉलोऑन तर वाचवता आलाच पण या सामन्यातही शानदार पुनरागमन केले.
भारतीय संघ २०२-२१ मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता, तेव्हा टीम इंडियाला ब्रिस्बेन कसोटीत ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. आता २०२४ च्या मेलबर्न कसोटीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्या सामन्यात शुभमन गिल खेळत होता, त्याने ९१ धावा केल्या होत्या पण मेलबर्न कसोटीसाठी गिलला वगळण्यात आले. पण त्या सामन्याचा सर्वात मोठा हिरो होता ऋषभ पंत, ज्याची ८९ धावांची खेळी चाहत्यांच्या मनात अजूनही ताजी असेल.
संबंधित बातम्या