India vs Australia 5th Test SCG : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा पाचवा आणि अंतिम सामना सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियन संघासमोर विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाच्या (५ जानेवारी) दुसऱ्या सत्रात पूर्ण केले.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने तब्बल ९ वर्षांनंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे.
या मालिका विजयासह कांगारू संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्येही प्रवेश केला. आता WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. WTC 2025 चा अंतिम सामना ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्स येथे खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ सलग दोन WTC फायनल खेळला आहे. पण दोन्ही वेळा भारताचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला.
सिडनी कसोटीत भारतीय संघाचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला ४ धावांची आघाडी मिळाली होती.
भारताने पर्थमधील पहिला कसोटी सामना २९५ धावांनी जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटी १० गडी राखून जिंकली. यानंतर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. तर ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी १८४ धावांनी जिंकली होती.
भारताच्या १६२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात धमाकेदार झाली आणि त्यांनी अवघ्या ३.४ षटकांत ३९ धावा केल्या. येथून प्रसीध कृष्णाने भारतीय संघात तीन विकेट मिळवून दिल्या आणि सामन्यात रंगत आणली. प्रसीधने प्रथम सॅम कॉन्स्टासला (२२) वॉशिंग्टन सुंदरकडे झेलबाद केले. त्यानंतर त्याने मार्नस लॅबुशेन (६) आणि स्टीव्ह स्मिथ (४) यांचीही शिकार केली. लॅबुशेन आणि स्मिथ या दोघांचा झेल यशस्वी जैस्वालने घेतला.
पण येथून उस्मान ख्वाज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात ५व्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी झाली. उस्मान ख्वाजाला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद करून सिराजने ही भागीदारी संपुष्टात आणली.
यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि ब्यू वेबस्टर यांनी भारतीय संघाला एकही संधी दिली नाही आणि ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले. जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला आला नाही. अशा स्थितीत भारतीय संघाची गोलंदाजी विखुरलेली दिसत होती, तरीही ऑस्ट्रेलियासाठी १६२ धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते.
संबंधित बातम्या