Shoaib Akhtar Viral Video : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमी बिनधास्त मतं मांडत असतो. त्यामुळं पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांवर त्याला प्रसिद्धीही मिळते. अलीकडंच त्यानं केलेलं एक वक्तव्य गाजत असताना आता त्यानं भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या वादात भारत सरकारला ओढलं आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एका टीव्ही शोमध्ये तो बोलत होता. 'पाकिस्तानात खेळण्यासाठी पाकिस्तानपेक्षा भारताचे खेळाडूच जास्त जीव सोडतायत. विराट कोहलीला पाकिस्तानात खेळण्याची तीव्र इच्छा आहे. बीसीसीआयचीही इच्छा आहे. मी त्यांच्यासोबत काम करतो, मला माहीत आहे. मी तुम्हाला खरं सांगतोय. भारतीय संघ पाकिस्तानात आला तर तिथल्या टीव्ही वाहिन्यांचं चांगभलं होईल. जाहिरातींचे दर गगनाला भिडतील. जगभरातून प्रायोजक येतील. ते येत नाहीत, त्यामुळं प्रायोजकत्वही येत नाही, असं तो म्हणाला.
हे सगळं माहीत असूनही भारतीय संघ पाकिस्तानात का येत नाही असा प्रश्न अँकरनं विचारला त्यावर शोएब अख्तरनं भारत सरकारकडं बोट दाखवलं. ‘भारत सरकारचा विरोध असल्यामुळं क्रिकेट संघ पाकिस्तानात येत नाही,’ असं शोएब अख्तर म्हणाला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं यजमानपद मिळालं असलं तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघ पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल ठरवण्यात आलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यास आक्षेप घेतला होता, मात्र नंतर पीसीबीनं नेहमीप्रमाणे माघार घेतली आणि आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध चांगले नाहीत आणि याचा परिणाम क्रिकेट संबंधांवरही झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत आणि दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येत असतात.
शोएब अख्तर यानं याआधीही भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट विषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीचं हायब्रीड मॉडेल पूर्वनियोजित असल्याचं तो म्हणाला. त्यामुळं आगामी काळात पाकिस्तानला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात जायचं असेल तर त्यांनी नक्की जावं आणि भारताला भारतातंच मारून यावं, असं तो म्हणाला होता.
संबंधित बातम्या