रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यासाठी रवाना होईल. येथे भारताला कांगारूंविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर, भारतीय संघाला पर्थमधील WACA मैदानावर १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान इंट्रा स्क्वॉड सामना खेळायचा होता. यात टीम इंडियााच सामना ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाशी होणार होता. पण आता ही इंट्रा स्क्वॉड मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्याच्या तयारीवर लक्ष केंद्रित करेल.
भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा देशांतर्गत संघ निवडला नव्हता, उलट आपल्याच संघासोबत सामना खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता तो रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी, भारतीय संघ WACA मैदानाच्या सेंटर विकेटवर सराव करेल जेणेकरुन ते कसोटी मालिकेपूर्वी स्वत:ची चांगली तयारी करू शकतील.
ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन दौऱ्यांवर भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यात कांगारू संघाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्यात त्यांना यश आले आहे. आता टीम इंडिया तिसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे आणि त्यात ते यशस्वी झाले तर नक्कीच नवा इतिहास लिहिला जाईल. मात्र, हे काम भारतीय संघासाठी इतके सोपे जाणार नाही.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.