रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. टीम इंडियाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ५० धावा, नंतर १०० धावा आणि आता सर्वात जलद २०० धावा करण्याचा विक्रम केला आहे. टीम इंडियासाठी ३० सप्टेंबर २०२४ हा दिवशी खूपच खास ठरला. या दिवशी भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत.
कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा संघ २३३ धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. जैस्वालने पहिल्याच षटकात सलग ३ चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते.
रोहित आणि जैस्वाल या जोडीने वेगाने धावा करत भारताची धावसंख्या केवळ ३ षटकांत ५१ धावांपर्यंत नेली. भारतीय संघाने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता, ज्याने यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध २६ चेंडूत ५० धावांचा टप्पा ओलांडला होता.
कर्णधार रोहित शर्मा ३ षटकात अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही चेंडूत २३ धावा करून बाद झाला. शुभमन गिलने सुरुवातीला संयोजित पद्धतीने खेळ केला असला तरी दुसरीकडे जैस्वाल थांबण्याचे नाव घेत नव्हता. भारताने ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.
या प्रकरणी टीम इंडियाने स्वतःचाच रेकॉर्ड नष्ट केला. भारताने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७४ चेंडूत १०० धावा केल्या होत्या, मात्र आता बांगलादेशविरुद्ध अवघ्या ६१ चेंडूत १०० धावा करून संघाने नवा इतिहास लिहिला आहे.
१०० धावा पूर्ण केल्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. जैस्वालने ७२ धावा केल्या, तर शुभमन गिल ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहली आणि ऋषभ पंतसह इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. पण तरी त्यांनी वेगवान फलंदाजीची लय कायम ठेवली. अखेर भारताने डावाच्या १४६व्या चेंडूवर २०० धावांचा टप्पा गाठला.
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, त्यांनी २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १६९ चेंडूत २०० धावा पूर्ण केल्या होत्या.
टीम इंडियाने अवघ्या ३४.४ षटकात ९ बाद २८५ धावा केल्या आणि डावात ८.२२ च्या धावगतीने धावा केल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आहे. २०१७ मध्ये, ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध कसोटी डावात ७.५२ च्या धावगतीने ३२ षटकात २४१ धावा केल्या होत्या.
तर सन २०२२ मध्ये, इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध ३५.५ षटकात ७.३६ च्या धावगतीने २६४ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या