India vs Australia Test : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू अशलेल्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर करंडक क्रिकेट स्पर्धेतील चौथा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. ही बॉक्सिंग डे टेस्ट आहे. बॉक्सिंग डे टेस्टमधील भारतीय क्रिकेट संघाचा इतिहास निराशाजनक आहे. तब्बल ३३ वर्षे भारताला या टेस्टमध्ये विजय मिळाला नव्हता. २०१८ साली ही परंपरा खंडीत झाली. त्याची पुनरावृत्ती होणार का याविषयी उत्सुकता आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील गाबा इथं झालेला तिसरा सामना बरोबरीत सुटला. ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. बॉक्सिंग डे टेस्ट २६ डिसेंबरला म्हणजेच ख्रिसमसच्या आदल्या दिवशी सुरू होते. जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचा विक्रम कसा आहे?
भारतानं ऑस्ट्रेलियात आतापर्यंत ९ बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले आहेत. दोन्ही संघांमध्ये पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना १९८५ मध्ये खेळला गेला होता. तो सामना अनिर्णित राहिला होता. तेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व कपिल देव यांच्याकडं होतं आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारताविरोधात सलग पाच बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्या. तर २०१४ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एमसीजीवर खेळलेला सामना अनिर्णित राहिला होता. हा इतिहास पाहता भारताला बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याचा आनंद तब्बल ३३ वर्षे मिळालेला नाही.
तब्बल ३३ वर्षांनंतर भारतानं दुहेरी धमाका केला होता. एमसीजीवर भारतानं मागील दोन सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया यावेळी खेळायला उतरेल तेव्हा मनोधैर्य वाढलेलं असेल. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला १३७ धावांनी पराभूत केलं होतं. २०२० मध्ये एमसीजीवर भारतानं ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पराभूत केलं होतं. तेव्हा अजिंक्य रहाणे भारताची धुरा सांभाळत होता. २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी खेळल्यानंतर कोहली पालकत्वाच्या रजेवर भारतात परतला होता. त्यानंतर रहाणेनं उर्वरित तीन सामन्यांचं नेतृत्व केलं.
गाबा कसोटीत शेपटाच्या फलंदाजांनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचं भारताचा कर्णधार रोहित शर्मा यानं कौतुक केलं. उर्वरित सामन्यांसाठी संघात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सलामीवीर केएल राहुलच्या ८४ धावांच्या खेळीनंतर अष्टपैलू रवींद्र जडेजानं ७७ धावांची खेळी केली. आकाश दीप (३१) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद १०) यांनी अखेरच्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवलं. जडेजा आणि राहुलचं कौतुक करायला हवं. यानंतर आकाश दीप आणि बुमराहनं दाखवलेली लढाऊ वृत्ती पाहून बरं वाटलं, असं तो म्हणाला.
संबंधित बातम्या