Mens T20I Cricketer of the Year, Arshdeep Singh : भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा आयसीसी मेन्स टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर २०२४ बनला आहे. या फॉरमॅटमध्ये अर्शदीप सिंग याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय संघाला टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनवण्यात अर्शदीप सिंगचे महत्त्वाचे योगदान होते. अशा स्थितीत आता आयसीसीने त्याला वर्षातील सर्वोत्तम टी-20 खेळाडूचा पुरस्कार दिला आहे.
गेल्या वर्षी अर्शदीप सिंगने टी-२० फॉरमॅटमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. या वेगवान गोलंदाजाने १८ टी-20 सामन्यांमध्ये विरोधी संघाच्या ३६ फलंदाजांना बाद केले. तसेच, गेल्या वर्षी सर्वाधिक टी-२० विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल होता.
विशेषत: अर्शदीप सिंगने २०२४ च्या टी-20 विश्वचषकात खूप प्रभावित केले. भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. टीम इंडियाच्या विजयात अर्शदीप सिंगचा मोठा वाटा होता.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये अर्शदीप सिंगपेक्षा फक्त ४ गोलंदाजांनी जास्त विकेट घेतल्या होत्या. यामध्ये सौदी अरेबियाचा उस्मान नजीब, श्रीलंकेचा वानेंदू हसरंगा, अमेरिकेचा जुनैद सिद्दीकी आणि हाँगकाँगचा एहसान खान यांची नावे आहेत.
या चार गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये अनुक्रमे ३८, ३८, ४० आणि ४६ विकेट घेतल्या. यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ३६ विकेट घेतल्या.
आकडेवारीनुसार अर्शदीप सिंगने ६१ टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये या वेगवान गोलंदाजाने १७.९१ च्या सरासरीने, १३.०३ च्या स्ट्राईक रेट आणि ८.२५ च्या इकॉनॉमीने ९७ फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. अर्शदीप सिंगची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे ९ धावांत ४ बळी आहे.
संबंधित बातम्या