IND vs SA Turning Points : भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला, हेनरिक क्लासेनची लय तोडली आणि इथेच सामना फिरला, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA Turning Points : भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला, हेनरिक क्लासेनची लय तोडली आणि इथेच सामना फिरला, वाचा

IND vs SA Turning Points : भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला, हेनरिक क्लासेनची लय तोडली आणि इथेच सामना फिरला, वाचा

Jun 29, 2024 11:53 PM IST

ind vs sa final turning points : भारताने टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. चोकर्सचा डाग पुसण्यात आफ्रिकेला पुन्हा एकदा अपयश आले.

IND vs SA Turning Points : भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला, हेनरिक क्लासेनची लय तोडली आणि इथेच सामना फिरला, वाचा
IND vs SA Turning Points : भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला, हेनरिक क्लासेनची लय तोडली आणि इथेच सामना फिरला, वाचा (PTI)

ind vs sa final t20 world cup 2024 : दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीने ७६ धावांची खेळी खेळली, त्यानंतर गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला.

आफ्रिकेला शेवटच्या ४ षटकात केवळ २६ धावांची गरज होती. येथून त्यांचा विजय निश्चित वाटत होता, पण तरीही भारतीय गोलंदाजांनी चोख गोलंदाजी करत विजय खेचून आणला.

कोहलीची निर्णायक खेळी

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव यांना मोठी खेळी खेळता आली नाही. पण त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्यातील ७२ धावांच्या भागीदारीने टीम इंडियाला सामन्यात परत आणले. 

अक्षर पटेलने ३१ चेंडूत ४७ तर विराट कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. शिवम दुबेने १६ चेंडूत २७ धावांची खेळी करत भारताला १७६ धावांपर्यंत पोहोचवले

डी कॉक आणि स्टब्सची भागीदारी तुटली

दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही कारण रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्कराम प्रत्येकी ४ धावा करून बाद झाले. पण इथून क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ६८ धावांची भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात परत आणले. स्टब्सने २१ चेंडूत ३१ धावांची वेगवान खेळी केली. सामना भारताच्या हातून निसटत होता. पण स्टब्स स्वताच्या चुकीने बोल्ड झाला.

मोक्याच्या क्षणी क्लासनेची विकेट गेली

दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ विकेटवर ७० धावा असताना हेनरिक क्लासेन फलंदाजीसाठी क्रीझवर आला. क्लासेनने येथून वेगवान फलंदाजीला सुरुवात केली आणि अवघ्या २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. क्लासेनने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. १५व्या षटकात, क्लासेनने अक्षर पटेलकडून २४ धावा केल्या, यानंतर वाटले की, सामना पूर्णपणे आफ्रिकेच्या हातात आहे. मात्र अखेरच्या ४ षटकांत भारताने गोलंदाजीच्या जोरावर पुनरागमन केले.

भारतीय खेळाडूंनी क्लासेनची लय तोडली

१७व्या षटकात भारतीय खेळाडूंनी गेम स्लो केला. हे षटक सुरू होण्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी थोडासा वेळ घेतला आणि सामन्याची गती मंद केली. याचे नुकसान फलंदाज हेनरिक क्लासेनला झाले. त्याची लय तुटली आणि हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला.

Whats_app_banner