भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेला आजपासून प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने आफ्रिकेचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर २०२ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात यजमान दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ १४१ धावा करून सर्वबाद झाला
संजू सॅमसनचे शतक आणि रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्या घातक गोलंदाजीने भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सॅमसनने १०७ धावा केल्या, तर बिश्नोई आणि चक्रवर्ती यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
आफ्रिकेने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर अभिषेक शर्माला मोठी खेळी खेळता आली नाही, पण संजू सॅमसनने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. संजूने ५० चेंडूत १०७ धावा ठोकल्या. त्याने ७ चौकार आणि १० षटकार मारले.
तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची तुफानी खेळी करत भारताची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
घरच्या मैदानावर २०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार एडन मार्कराम अवघ्या ८ धावा करून बाद झाला आणि यजमान संघाने ४४ धावसंख्येपर्यंत तीनही आघाडीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या.
हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी ४२ धावांची भागीदारी केली, मात्र वरुण चक्रवर्तीने एकाच षटकात दोघांनाही बाद करून आफ्रिकन संघाला मोठा धक्का दिला.
भारतीय संघाने शेवटच्या ५ षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली नाही, परंतु गोलंदाजांनी त्याची भरपाई केली. दक्षिण आफ्रिका सुरुवातीपासूनच मोठी भागीदारी रचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत होते. त्यांच्या अवघ्या ४४ धावांत ३ विकेट पडल्या होत्या आणि धावसंख्या ९३ धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत आफ्रिकेचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
परिस्थिती अशी होती की दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या १० षटकात १२५ धावा करायच्या होत्या, मात्र मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या, त्याशिवाय आवेश खाननेही दोन आणि अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.