टी-20 विश्वचषक २०२४ चा १९ वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. ९ जून (रविवारी) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी केवळ १२० धावांचे लक्ष्य होते, मात्र पाकिस्तानला ७ गडी गमावून केवळ ११३ धावाच करता आल्या. भारतीय संघाच्या गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या जबरदस्त गोलंदाजी करत सामना फिरवला.
जसप्रीत बुमराहने ४ षटकात केवळ १३ धावा देत ३ बळी घेतले. हार्दिक पंड्यानेही फखर जमान आणि शादाब खानला बाद करून भारताला सामन्यात परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. अर्शदीपनेच सामन्यातील शेवटचे षटक टाकले ज्यामध्ये पाकिस्तानला १८ धावा करायच्या होत्या.
धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ १४व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावा होती. पण यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. कारण रिझवान आणि शादाब एकामागोमाग बाद झाले.
जसप्रीत बुमराह १९व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ ३ धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. २० व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी १८ धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ ११ धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवले.
टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून बुमराहने ३ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर हार्दिकने २ विकेट घेतल्या. तर अर्शदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि दुसऱ्याच षटकात विराट कोहलीची विकेट गमावली. कोहली ४ धावा करून नसीम शाहच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर चालायला लागला. रोहितने १३ धावा केल्या. यानंतर डावखुरा फलंदाज अक्षर पटेल आणि ऋषभ पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावा जोडून डाव सांभाळला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पटेलला नसीमने बोल्ड केले.
अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी झाली. एकेकाळी भारताची धावसंख्या तीन गडी बाद ८९ धावा होती आणि या खेळपट्टीवर चांगली धावसंख्या उभारण्यात यश मिळेल असे वाटत होते, पण पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत भारताला एकामागोमाग धक्के दिले. भारताने ३० धावांत ७ विकेट गमावल्या.
भारतीय संघ केवळ १९ षटके खेळू शकला आणि ११९ धावा केल्या. ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावांची खेळी खेळली. भारताकडून ऋषभ पंतने ३१ चेंडूत ६ चौकारांसह सर्वाधिक ४२ धावा केल्या. पाकिस्तानकडून अक्षर पटेलने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २० धावा केल्या, तर हरिस रौफ आणि नसीम शाहने प्रत्येकी ३ बळी घेतले. तर मोहम्मद आमिरला २ विकेट मिळाल्या.