India vs England 2nd ODI Match Highlights : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकली आहे. मालिकेतील दुसरा सामना आज रविवारी (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सर्वबाद ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४४.३ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा करत सामना जिंकला.
हा सामना हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकाही २-० अशी खिशात घातली आहे. याआधी भारतीय संघाने नागपूर वनडेतही केवळ ४ विकेट्सने विजय मिळवला होता. आता पुढचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी खेळला जाईल.
भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्माने ९० चेंडूत ११९ धावांची तुफानी शतकी खेळी खेळली. त्याने एकूण ७ षटकार आणि १२ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही १३२.२२ होता.
रोहितचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने ७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहितने १६ महिन्यांनंतर वनडेमध्ये शतक झळकावले आहे.
यापूर्वी त्याने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर दिल्लीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने १३१ धावांची खेळी केली होती.
३०५ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. या दोघांनी मिळून अवघ्या १५ षटकांत संघाची धावसंख्या ११४ पर्यंत नेली. रोहित आणि गिल यांच्यात १३६ धावांची सलामीची भागीदारी झाली.
रोहितशिवाय शुभमन गिलने ५२ चेंडूत ६० धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ४४ आणि अक्षर पटेलने नाबाद ४१ धावा केल्या. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला भारतीय संघाला रोखण्यात यश आले नाही. जेमी ओव्हरटनने सर्वाधिक २ बळी घेतले. तर गस ऍटकिन्सन, आदिल रशीद आणि लियाम लिव्हिंगस्टोनने १-१ विकेट घेतली.
तत्पूर्वी, इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिल सॉल्ट यांनीही वेगवान सुरुवात केली होती. दोघांनी १० षटकात ८० धावांची सलामी दिली. सॉल्ट बाद झाल्यानंतर डकेट आणि जो रूट यांनी संघासाठी चमकदार कामगिरी केली. या दोघांनी अर्धशतके झळकावली. डकेट ६५ धावा करून बाद झाला. रुट ६९ धावा करून बाद झाला. जोस बटलरने ३४ धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे संपूर्ण संघ ५०व्या षटकात ३०४ धावा करून ऑल आऊट झाला.
तर गोलंदाजीत रवींद्र जडेजाने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ३५ धावा देत ३ बळी घेतले. यानंतर वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
संबंधित बातम्या