भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा १३३ धावांनी पराभव केला आहे. भारताने प्रथम खेळताना २० षटकात विक्रमी २९७ धावा ठोकल्या होत्या, पण प्रत्युत्तरात बांगलादेशला १६४ धावाच करता आल्या. यासह टीम इंडियाने बांगलादेशचा तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला आहे.
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात संजू सॅमसन भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला, त्याने अवघ्या ४७ चेंडूत १११ धावांची ऐतिहासिक खेळी केली.
कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही अर्धशतक केले आणि ७५ धावांची खेळी खेळली. भारताच्या विजयी संघाकडून रवी बिश्नोईने ३ आणि मयंक यादवने २ बळी घेतले.
या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा अवघ्या ४ धावा करून बाद झाला, मात्र त्यानंतर सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात १७३ धावांची ऐतिहासिक भागीदारी झाली. सॅमसनने १११ धावा केल्या, तर दुसरीकडे सूर्यकुमारने ७५ धावांची खेळी केली.
त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनी स्फोटक पद्धतीने अनुक्रमे ४७ आणि ३४ धावा केल्या. बांगलादेशकडून तनझिम हसन साकिबने सर्वाधिक ३ बळी घेतले.
भारताच्या २९८ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बांगलादेश मैदानात उतरला तेव्हा मयंक यादवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर परवेझ हुसैन इमॉनला शून्य धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर ५९ धावसंख्येपर्यंत पाहुण्या संघाचे टॉप-३ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
अशा स्थितीत लिटन दास आणि तौहीद हृदय यांच्यात ५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. लिटनने २५ चेंडूत ४२ धावा केल्या, तर तौहीद ६५ धावा करून नाबाद परतला. आपल्या टी-20 कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी आलेला महमुदुल्लाही केवळ ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
बांगलादेशने २० षटकात ७ बाद १६४ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिष्णोईने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर मयंक यादव याने बांगलादेशचे २ फलंदाज बाद केले.