India vs South Africa test highlights : भारताने केपटाऊन कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते, हे लक्ष्य भारताने सहज गाठले.
या विजयासह भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते.
भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये भारताने एकही कसोटी जिंकलेली नव्हती. पण आता भारताने केपटाऊनमधील विजयाचा दुष्काळ संपवला आहे. एवढेच नाही तर केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई देशाचा हा पहिला कसोटी विजय ठरला आहे.
७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने २३ चेंडूत ६ चौकारांसह २८ धावा केल्या. रोहित शर्मा १७ धावा करून नाबाद राहिला. यशस्वीसह भारताने दुसऱ्या डावात विराट कोहली आणि शुभमन गिलची विकेटही गमावली. कोहलीने १२ आणि गिलने १० धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका आज (४ जानेवारी) दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ते १७६ धावांत सर्वबाद झाले. पहिल्या डावात आफ्रिकेने ५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत आपल्या पहिल्या डावात १५३ धावांवर ऑलआऊट झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले होते.
केपटाऊन कसोटीत आज आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात ३ बाद ६२ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात डेव्हिड बेडिंगहॅमला जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. बेडिंगहॅमला केवळ ११ धावा करता आल्या.
त्यानंतर बुमराहने काइल वेरेनलाही स्वस्तात बाद केले. वेरेन बाद झाल्यानंतर आफ्रिकेची धावसंख्या ५ विकेट्सवर ८५ धावा झाली.
आफ्रिकेचे फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत राहिले पण दुसऱ्या टोकाने मार्करम आक्रमक फलंदाजी करत होता. एडन मार्करामने अवघ्या ९९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मार्करामने १७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या.
मार्करामला मोहम्मद सिराजने बाद केले. मार्कराम बाद झाल्यानंतर आफ्रिकेने उर्वरित दोन विकेट स्वस्तात गमावल्या.
भारताकडून जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या. मुकेश कुमार यांना दोन विकेट मिळाले. प्रसीद कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ विकेट घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताचा पहिला डाव १५३ धावांवर आटोपला. भारताचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने ३९ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने ३६ आणि विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुललाच आपले खाते उघडता आले. त्याने ८ धावा केल्या.
यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार हे फलंदाज शुन्यावर बाद झाले. मुकेश कुमार एकही चेंडूचा सामना न करता नाबाद राहिला.
आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.
संबंधित बातम्या