भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ११ धावांनी विजय मिळवला. अशा प्रकारे भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता शेवटचा सामना जोहान्सबर्ग येथे शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) होणार आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २१९ धावा केल्या. याला प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २० षटकांत ७ गडी गमावून २०८ धावांपर्यंत मजल मारली.
दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सनने १७ चेंडूत ५४ धावांची शानदार खेळी केली, पण तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. याशिवाय हेनरिक क्लासेनने २२ चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले.
भारताच्या २१९ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का २७ धावांवर बसला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रायन रिक्लेटन १५ चेंडूत २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
तर, रीझा हेंड्रिक्सने १३ चेंडूत २१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने १८ चेंडूत २९ धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्स १२ चेंडूत १२ धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला. यानंतर हेनरिक क्लासेनने २२ चेंडूत ४१ धावा केल्या. हेन्रिक क्लासेनला अर्शदीप सिंगने बाद केले.
भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने ४ षटकांत ३७ धावांत ३ फलंदाज बाद केले. वरुण चक्रवर्तीला २ विकेट मिळाले. याशिवाय हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तो ५६ चेंडूत १०७ धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकार मारले. भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने २५ चेंडूत ५० धावा केल्या.