India Vs New Zealand Semi Final World Cup : टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्डकप २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात दोन्ही डावात मिळून ७२४ धावा झाल्या.
भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७धावांत ऑलआऊट झाला आणि सामना ७० धावांनी गमावला.
भारताने ३९८ धावांसारखे मोठे लक्ष्य दिल्यानंतर किवीज दबावात येऊन लवकर बाद होतील, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने (११९ चेंडूत ९ चौकार आणि ७ षटकारांसह १३४ धावा) चांगली झुंज दिली. न्यूझीलंडचा पराभव झाला पण या फलंदाजाने सर्वांची मने जिंकली.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २ गडी लवकर गमावले होते. मात्र, असे असतानाही न्यूझीलंडने सामना पूर्णपणे भारताच्या ताब्यात दिला नाही. किवी संघाला सुरुवातीचे दोन्ही धक्के मोहम्मद शमीने दिले. शमीने ६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवे (१३) आणि ८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रचिन रवींद्रला (१३) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
दोन विकेट लवकर पडल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ चेंडूत १८१ धावांची भागीदारी केली. ही उमलणारी भागीदारी मोहम्मद शमीने ३३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर किवी कर्णधार केन विल्यमसनची विकेट घेत मोडली. विल्यमसनने ७३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली.
शमी इथेच थांबला नाही आणि षटकाच्या चौथ्या चेंडूवर टॉम लॅथमला शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
न्यूझीलंडने २२० धावांत ४ विकेट गमावल्यानंतर पुन्हा एकदा भारताचा वरचष्मा राहिला. मात्र पाचव्या विकेटसाठी डॅरिल मिशेलने ग्लेन फिलिप्ससोबत भागीदारी सुरू केल्याने भारतीय संघाचा तणाव पुन्हा एकदा वाढला. फिलिप्स आणि मिशेल यांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची (६१ चेंडू) भागीदारी केली.ही भागिदारी जसप्रीत बुमराहने ४३ व्या षटकात फिलिप्सची विकेट घेत मोडून काढली. यानंतर ४४व्या षटकात कुलदीप यादवने मार्क चॅम्पमनला (२) पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
त्यानंतर मोहम्मद शमीने डॅरिल मिचेलला बाद केले. शमीने ४६व्या षटकात मिशेलला बाद केले. मिशेल १३४ धावांची झुंजार इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताकडून मोहम्मद शमीने ७ विकेट घेतल्या. अशाप्रकारे आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत न्यूझीलंडला पराभूत करण्यात भारताला यश आले आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.
भारताचा हा सलग १०वा विजय आहे. हा देखील एक विक्रमच आहे. या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या १६ नोव्हेंबरला ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत या सामन्यातील विजेत्यासोबत जेतेपदाचा सामना खेळेल.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ११७ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने १०५ धावांची खेळी केली. शुभमन गिलने नाबाद ८० धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहितने ४७ आणि लोकेश राहुलने नाबाद ३९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ३ आणि ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली.