IND vs ENG 5th T20 Highlights : भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पाचवा म्हणजेच शेवटचा सामना रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ही मालिका ४-१ अशी जिंकली.
या सामन्यात भारतीय संघाने २४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या १०.३ षटकांत ९७ धावांत गारद झाला. इंग्लिश संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टने २३ चेंडूत ५५ धावांची शानदार खेळी केली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
तर जेकब बेथेलने १० धावा केल्या. या दोघांशिवाय एकाही इंग्लिश फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले. रवी बिश्नोईने एक विकेट घेतली.
मुंबईत टीम इंडियासाठी अभिषेक शर्माने अप्रतिम कामगिरी केली. स्फोटक शतक झळकावण्यासोबतच त्याने २ बळीही घेतले. या सामन्यात अभिषेकने अनेक विक्रम मोडीत काढले. शिवम दुबेनेही भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट गमावून २४७ धावा केल्या होत्या. सलामीवीर संजू सॅमसन याने संघाला धमाकेदार सुरुवात करून देताना डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर अभिषेक शर्माने आधी १७ चेंडूत अर्धशतक केले. यानंतर त्याने याचे वेगवान शतकात रूपांतर केले. अभिषेकने ३७ चेंडूत झटपट शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.
त्याने ४० चेंडूत शतक झळकावणाऱ्या संजू सॅमसनचा विक्रम मोडला आहे. मात्र, भारतीयांमध्ये रोहित शर्माच्या नावावर ३५ चेंडूत सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम आहे, जो अजूनही अबाधित आहे.
तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा हा विक्रम एस्टोनियाच्या साहिल चौहानच्या नावावर आहे. मागच्या वर्षी १७ जून २०२४ रोजी त्याने सायप्रस संघाविरुद्ध २७ चेंडूत शतक झळकावले होते.
या सामन्यात अभिषेकने भारतीय संघाकडून ५४ चेंडूत एकूण १३५ धावांची खेळी केली. त्याने १३ षटकार आणि ७ चौकार मारले. तर टिळक वर्माने १५ चेंडूत २४ धावा केल्या. अभिषेक आणि टिळक यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ११५ धावांची भागीदारी झाली.
शिवम दुबेने १३ चेंडूत ३० धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रेडेन कार्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर मार्क वुडला २ विकेट मिळाले.
संबंधित बातम्या