IND vs BAN Highlights : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा ७ विकेटने पराभव करत मालिका २-० ने जिंकली. पहिल्या ३ दिवसात पावसामुळे फक्त ३५ षटकांचा खेळ होऊ शकला होता, मात्र पुढच्या २ दिवसात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केला.
विशेष म्हणजे, हा तोच बांगलादेशचा संघ आहे, ज्याने महिनाभरापूर्वी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केले होते.
या विजयामुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारताचा मार्ग पूर्वीपेक्षा थोडा सोपा झाला आहे. तर बांगलादेश न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे नुकसान झाले आहे.
कानपूर कसोटीच्या पाचव्या दिवशी (१ ऑक्टोबर) बांगलादेशने २६/२ धावसंख्येसह त्यांचा डाव पुढे नेला, पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊनच उतरल्याचे दिसत होते.
कर्णधार नजमुल शांतो आणि शादमान इस्लाम यांच्यात ५५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. एकेकाळी बांगलादेशची धावसंख्या ३ विकेटवर ९१ धावा होती, अशा स्थितीत सामना ड्रॉ होईल, असे वाटत होते. पण पुढच्या ५५ धावांत पाहुण्या संघाने उरलेल्या ७ विकेट्सही गमावल्या. बुमराह, अश्विन आणि जडेजानं बांगलादेशला पहिल्याच सत्रात गारद केले.
चौथ्या डावात भारताला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला, मात्र यशस्वी जैस्वालने ५१ धावांचे अर्धशतक झळकावले. बाकी विराट कोहलीच्या २९ धावांच्या खेळीने पूर्ण केले. अशा प्रकारे भारताने हा सामना ७ विकेटने जिंकला आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसनने कानपूर कसोटीत विजयाचा दावा केला. तो म्हणाला की बांगलादेश संघाने अशा जटिल परिस्थितीवर मात केली आहे आणि पुन्हा असे करण्यास सक्षम आहे. पण सत्य हे आहे की बांगलादेशचा संघ पाचव्या दिवशी पूर्ण एक सत्रही क्रीझवर टिकू शकला नाही.
या विजयासह भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदासाठी पात्र होण्याच्या जवळ पोहोचला आहे. ११ सामन्यांमधला हा भारताचा ८ वा विजय असून गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर आहे. यानंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची मायदेशातील मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ ची फायनल पुढील वर्षी खेळवली जाणार आहे आणि त्याआधी भारताला आणखी ८ टेस्ट मॅच खेळायच्या आहेत.
भारत गुणतालिकेत अव्वल आहे आणि त्याची गुणांची टक्केवारी ७४.२४ पर्यंत वाढली आहे, तर ऑस्ट्रेलिया ६२.५० गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.