Ind vs Aus Test Day 3 : जसप्रीत बुमराह भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील टीम इंडियासाठी एकमेव आशा स्थान. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटीतील पहिल्या डावात बुमराहने ६ विकेट घेतल्या. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला तेवढी साथ मिळाली नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा ठोकल्या. यानंतर चाहत्यांनी भारतीय गोलंदाजांवर प्रचंड टीका केली. पण आता बुमराहने आपल्या सहकारी गोलंदाजांचा बचाव केला आहे.
गाबा कसोटीच्या पहिल्या डावानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहच्या नावावर १८ विकेट्स आहेत. बाकीच्या गोलंदाजांशी त्याची तुलना केली तर इतर सर्व भारतीय वेगवान गोलंदाजांना मिळून केवळ १९ विकेट घेता आल्या आहेत. ही कामगिरी पाहून चाहते इतर गोलंदाजांवर टीका करत आहेत.
पण बुमराहची विचारसरणी वेगळी आहे. गाबा कसोटीचा तिसरा दिवस संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्पष्टपणे सांगितले की, वैयक्तिक यशापेक्षा संघाच्या हिताकडेच आमचे लक्ष आहे.
बुमराह म्हणाला, 'एक संघ म्हणून आम्ही एकमेकांकडे बोटं दाखवत नाही. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा असे आम्ही म्हणत नाही. बॉलिंग युनिट म्हणून आम्ही एका संक्रमणातून जात आहोत. मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
ते आणखी चांगले होतील. तिथे पोहोचण्याचा हा प्रवास आहे. आमच्याकडे अकरा खेळाडू आहेत. ही एक नवीन टीम आहे, हा एक प्रवास आहे. प्रत्येकाला यातून जावे लागते. तुमच्या खेळाविषयी समजून घ्या, शिका, सुधारा आणि पुढे जा. हा एक प्रवास आहे."
या दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाच्या बॉलिंग युनिटमध्ये बरेच काही सुरू आहे. भारताने पहिल्या कसोटीत हर्षित राणाला खेळवले. त्याचं खूप कौतुकही झालं. पण ॲडलेडमध्ये त्याला फारसे काही करता आले नाही. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत आकाश दीप तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आला.
आणि या सगळ्यात मोहम्मद सिराज बुमराहसोबत दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून खेळत आहे. सिराजचा स्वतःचा फॉर्मही फारसा चांगला नाही. त्याला विकेट घेण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. पण बुमराहला सिराजच्या क्षमतेवर विश्वास आहे.
याबाबत बुमराह म्हणाला, 'आपण यावर बोलू. या सामन्यापूर्वी त्याने चांगली गोलंदाजी केली होती. त्याला थोडा त्रास झाला पण तो गोलंदाजी करत राहिला. ही लढाऊ वृत्ती आहे आणि संघाला तीच हवी आहे. काही दिवस तुम्ही चांगली गोलंदाजी करता आणि विकेट घेता. काही दिवस तुम्हाला विकेट मिळत नाहीत. हे मी त्याला आधीही सांगितले आहे. तो खूप चांगल्या स्पेस आणि अॅटीट्युडमध्ये आहे.
सिराजने या मालिकेत आतापर्यंत ११ बळी घेतले आहेत. त्याने ५ डावात या विकेट घेतल्या. कसोटी मालिकेतील पाच डावांनंतर फक्त मिचेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त विकेट आहेत. स्टार्कने १३, तर बुमराहने १८ विकेट्स घेतल्या आहेत. तर पॅट कमिन्सने ११ विकेट घेतल्या आहेत. मात्र, सरासरी आणि स्ट्राइक रेट पाहता या चौघांमध्ये सिराजची अवस्था सर्वात वाईट आहे.
संबंधित बातम्या