न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीने आज शुक्रवारी (११ ऑक्टोबर) टीम इंडियाची घोषणा केली.
न्यूझीलंडचा संघ १६ ऑक्टोबरपासून भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
अलीकडेच भारतीय संघाने बांगलादेशचा २-० असा पराभव केला होता. त्याचबरोबर आता न्यूझीलंड आपल्या घरच्या मैदानावर ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करायचे आहे.
न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर असतील. यानंतर शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल आणि सरफराज खान या फलंदाजांची टॉप ऑर्डरसाठी निवड करण्यात आली आहे. तर ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात आहेत.
तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव फिरकी विभाग सांभाळतील. तसेच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप वेगवान गोलंदाज म्हणून असतील.
या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. यावेळी भारतीय निवड समितीने जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवून मोठे संकेत दिल्याचे मानले जात आहे. रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळू शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.