IND vs ENG Test : भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा, जैस्वालचं द्विशतक, अँडरसनचे तीन विकेट-india all out on 396 in 1st inning vs england 2nd test day 2 vizag yashasvi jaiswal double century highlights scoercard ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG Test : भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा, जैस्वालचं द्विशतक, अँडरसनचे तीन विकेट

IND vs ENG Test : भारताच्या पहिल्या डावात ३९६ धावा, जैस्वालचं द्विशतक, अँडरसनचे तीन विकेट

Feb 03, 2024 11:13 AM IST

IND vs ENG Test Day 2 : विशाखापट्टणम कसोटीत भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला आहे. पहिल्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वालने शानदार २०९ धावा केल्या.

IND vs ENG Test Day 2
IND vs ENG Test Day 2 (AP)

India vs England 2nd Test Day 2, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.

आजच्या दिवसाचे सर्वात मोठे आकर्षण यशस्वी जैस्वालचे द्विशतक ठरले. मात्र, द्विशतक झळकावल्यानंतर काही वेळातच यशस्वी जैस्वाल २०९ धावांवर जेम्स अँडरसनची शिकार ठरला. अँडरसनला षटकार मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. जॉनी बेयरस्टॉने त्याचा झेल टिपला. यशस्वी जैस्वालने २९० चेंडूत २०९ धावांची शानदार खेळी केली. त्याने १९ चौकार आणि ७ षटकार ठोकले.

यशस्वी जैस्वाल कसोटीत द्विशतक करणारा तिसरा सर्वात युवा भारतीय ठरला. त्याने विनोंद कांबळी आणि सुनील गावस्कर या दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

कसोटीत द्विशतक करणारे युवा भारतीय

विनोद कांबळी- २२४ धावा वि. इंग्लंड १९९३ (२१ वर्षे ३५ दिवस)

विनोद कांबळी- २२७ धावा वि. झिम्बाब्वे, १९९३ (२१ वर्षे ५५ दिवस)

सुनील गावस्कर- २२० धावा वि.वेस्ट इंडिज १९७१ (२१ वर्षे २८३ दिवस)

यशस्वी जैस्वाल- २०९ वि. इंग्लंड २०२४ (२२ वर्षे ३७ दिवस

दरम्यान, पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. पहिल्या सामन्याचा हिरो असलेल्या टॉम हार्टलीला एक विकेट मिळाली.

यशस्वी जैस्वालशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला ४० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. ३४ धावा करणारा शुभमन गिल संघाकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.

भारताचे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. त्यांची आता भारतीय संघातून हकालपट्टी निश्चित मानली जात आहे.  तिसऱ्या कसोटीसाठी संघनिवड अजून व्हायची आहे. विराट कोहली आणि केएल राहुल संघात परतले तर श्रेयस अय्यर आणि गिल टीम इंडियातून बाहेर जाऊ शकतात.