पुणे कसोटीत भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला आहे. अशाप्रकारे न्यूझीलंडकडे पहिल्या डावाच्या आधारे १०३ धावांची आघाडी मिळाली आहे. टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. न्यूझीलंडकडून फिरकीपटू मिचेल सँटनरने ५३ धाावा देत ७ विकेट घेतल्या. आज (२५ ऑक्टोबर) सामन्याचा दुसरा दिवस आहे.
तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने पहिल्या डावात २५९ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने ७ विकेट घेतल्या.
पहिल्या डावात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळला. सँटनरने ५३ धावांत ७ बळी घेतले. याआधी भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने ९ चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही.
यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी आज दुसऱ्या दिवशी दमदार सुरुवात केली. भारतीय संघाची धावसंख्या ५० धावांवर पोहोचली तेव्हा टीम इंडियाला दुसरा धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला, गिल (३०) मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू झाला. यानंतर विराट कोहली आला जो फक्त १ धावा काढून बाद झाला. कोहली मिचेल सँटनरच्या फुल टॉस बॉलवर क्लीन बोल्ड झाला.
दुसरीकडे, सावध खेळणारा यशस्वी जैस्वाल ३० धावांवर ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर डॅरिल मिशेलकडे झेलबाद झाला. जैस्वाल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत (१८) देखील ग्लेन फिलिप्सच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. पंत बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ८३/५ होती.
यानंतर काही वेळातच सँटनरच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना सर्फराज खान (११) विल्यम ओ'रुर्केकरवी झेलबाद झाला. अश्विन बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ७ बाद १०३ धावा होती. यानंतर रवींद्र जडेजाने (३८) संघर्ष केला. पण तोही सँटनरचाही बळी ठरला. आकाश दीप (६) आणि बुमराह (०) हेही सॅन्टनरचे बळी ठरले. वॉशिंग्टन सुंदर १८ धावांवर नाबाद राहिला.
संबंधित बातम्या