इमर्जिंग टीम्स आशिया कप २०२४ मध्ये भारताने सलग दुसरा विजय मिळवला आहे. आज (२१ ऑक्टोबर) भारत अ संघाने युएईचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना UAE संघाने १७ षटकात केवळ १०७ धावा केल्या होत्या. यानंतर भारताने अभिषेक शर्माच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर अवघ्या ११व्या षटकात सामना जिंकला
यूएईचा हा दोन सामन्यांतील पहिला पराभव आहे. या विजयासह भारत अ संघाने उपांत्य फेरीचे तिकीटही निश्चित केले आहे.
१०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग पहिल्याच षटकात बाद झाला. ओमिद रहमानने त्याला बोल्ड केले. मात्र, यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी गोलंदाजांवर हल्लाबोल केला.
दुसऱ्या षटकात अभिषेकने कर्णधार बासिल हमीदला २२ चोपल्या. यानंतर तिलककने तिसऱ्या षटकात दोन चौकार मारले. यानंतरही दोन्ही फलंदाजांचे आक्रमण सुरूच होते. ६ षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर ७४ धावा होती. यानंतर यूएईच्या गोलंदाजांनी दमदार केले. तिलक ७व्या षटकात १८ चेंडूत २१ धावा काढून बाद झाला.
अभिषेक शर्माने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. २४ चेंडूत ५८ धावा करून तो बाद झाला. आयुष बडोनी आणि निहाल वढेरा यांनी येथून संघाला लक्ष्यापर्यंत नेले.
याआधी भारत अ च्या गोलंदाजांनी युएईला फलंदाजीत एकही संधी दिली नाही. अंशुल कंबोजने पहिल्याच षटकात मयंक राजेश कुमारला बाद केले. यानंतर दुसऱ्याच षटकात आर्यांश शर्मा हा वैभव अरोराचा बळी ठरला. रसिक सलामने सहाव्या षटकात ३ बळी घेतले. यासह यूएईची धावसंख्या ६ षटकांत ५ बाद ३९ धावा अशी झाली. भारतीय गोलंदाजांचा सामना फक्त राहुल चोप्रा करू शकला. त्याने ५० चेंडूत ५० धावा केल्या.