महिला टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये टीम इंडियाने पहिला विजय मिळवला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला.
या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १९व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हे लक्ष्य पूर्ण केले. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ५८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, त्यापूर्वी छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि १८ धावांवर स्मृती मानधना १६ चेंडूत (७ धावा) करून बाद झाली. स्मृती डावखुरी फिरकीपटू सादिया इक्बालच्या चेंडूवर तुबा हसनकरवी झेलबाद झाली.
येथून शेफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी डावाची धुरा सांभाळत दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली.
यानंतर शेफाली वर्मा बाद झाली. तिला पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने बाद केले. शेफाली वर्माने ३५ चेंडूंत ३ चौकारांसह ३२ धावा केल्या. जेमिमाने २८ चेंडूंचा सामना करत २३ धावांचे योगदान दिले.
जेमिमा आणि त्यानंतर आलेली ऋचा घोष लागोपाठ बाद झाल्या. दोघींना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने तंबूत पाठवले. ऋचा बाद झाली तेव्हा भारताची धावसंख्या चार विकेटवर ८३ धावा होती. लागोपाठच्या चेंडूंवर दोन विकेट पडल्याने भारतीय संघ काहीसा दडपणाखाली आल्याचे दिसून आले.
पण येथून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी भारतीय संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, भारताला विजयासाठी दोन धावांची गरज असताना हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे निवृत्त झाली. हरमनप्रीतने २४ चेंडूत सर्वाधिक २९ धावा केल्या. तर दीप्ती शर्मा ७ धावांवर नाबाद राहिली आणि सजना सजीवन ४ धावांवर नाबाद राहिली.
तत्पूर्वी, टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि पहिल्याच षटकात गुल फिरोझा (०) वेगवान गोलंदाज रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाली. यानंतर सिद्रा अमीन (८ धावा)ही स्वस्तात बाद झाली. सिद्राला फिरकीपटू दीप्ती शर्माने बोल्ड केले.
ओमाम्मा सोहेल (३) देखील फार काही करू शकला नाही आणि अरुंधती रेड्डीच्या चेंडूवर शेफाली वर्माकडे झेलबाद झाली.
ओमामा बाद झाली तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या ३३/३ अशी होती. यानंतर सेट फलंदाज मुनिबा अली (१७ धावा) देखील पॅव्हेलियनमध्ये परतली, त्यामुळे पाकिस्तानची धावसंख्या ४ विकेटवर ४१ धावा झाली. श्रेयंका पाटीलने मुनिबाची विकेट घेतली.
पाकिस्तानला पाचवा झटका वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिने दिला, ज्याने आलिया रियाझला (४ धावा) एलबीडब्ल्यू केले. या सामन्यात कर्णधार फातिमा सना (१३ धावा) फलंदाजीत चमत्कार करू शकली नाही आणि फिरकीपटू आशा शोभनाच्या चेंडूवर विकेटच्या मागे झेलबाद झाली. तुबा हसनला (०) ऑफस्पिनर श्रेयंका पाटीलने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
येथून निदा दार आणि सय्यदा अरुब शाह यांनी आठव्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी केल्याने पाकिस्तान संघ १०० धावांचा टप्पा पार करू शकला. पाकिस्तानकडून निदा दार हिने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली.
संबंधित बातम्या