महिला टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (४ ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ५८ धावांनी पराभव केला. यासह भारताचा या स्पर्धेतील प्रवास पराभवाने सुरू झाला आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने निर्धारित २० षटकात १६० धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९ षटकात १०२ धावांवर गारद झाला.
या सामन्यात भारतीय महिला संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांची पूर्ण निराशा झाली आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत टीम इंडियाला हा पराभव जड जाऊ शकतो.
१६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. कारण संघाने ४२ धावांतच आघाडीच्या तिन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर मधल्या फळीत जेमिमाह रॉड्रिग्ज आणि ऋचा घोष याही अनुक्रमे १३ आणि १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या.
स्कोअर ७५ झाला तोपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. भारताने पुढच्या २७ धावांत उर्वरित ५ विकेट गमावल्या.
भारताकडून हरमनप्रीत कौरने सर्वाधिक १५ धावा केल्या. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १३ धावांची खेळी केली. ईडन कार्सनने टीम इंडियाला सुरुवातीचा धक्का दिला. कोणत्याही विकेटसाठी मोठी भागीदारी न होणे हे या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
न्यूझीलंडकडून रोजमेरी मायरने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर भारताचे स्मृती मानधना, शेफाली वर्मा हे पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत धावा करण्यात अपयशी ठरल्या. मानधनाने १२ तर शेफालीने २ धावा केल्या.
न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिव्हाईन शेवटपर्यंत क्रीजवर राहिली आणि तिने ३६ चेंडूत ५७ धावांची खेळी खेळली. ती शेवटपर्यंत मैदानात राहिल्यानेच संघाने १६० धावांचा आकडा गाठला.
त्याआधी सलामीच्या फलंदाज सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी झाली, जी अरुंधती रेड्डीने मोडली. तिने बेट्सला श्रेयंका पाटीलकरवी झेलबाद केले. तिने दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा काढल्या. त्याचवेळी जॉर्जियाने ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावा केल्या.
यानंतर अमेलिया केर आणि सोफी डिव्हाईन यांनी सुत्रे हाती घेतली. दोघींध्ये तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी झाली. रेणुका सिंगने १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केरला बाद केले. केवळ १३ धावा करून ती परतली. यानंतर ब्रूक हॅलिडेने कर्णधाराला साथ दिली. दोघींमध्ये ४६ धावांची भागीदारी झाली, जी रेणुकाने १९व्या षटकात मोडली.
ब्रूक १६ धावा करून बाद झाला. तर, सोफी डिव्हाईन ५७ धावा करून नाबाद राहिली आणि मॅडी ग्रीन ५ धावा करून नाबाद राहिली. भारतातर्फे रेणुकाने २, अरुंधती आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), जेस केर, रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन.
भारताची प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
संबंधित बातम्या